‘जय गणेश रुग्णसेवा’ अभियान सुरू
By admin | Published: July 17, 2017 04:27 AM2017-07-17T04:27:24+5:302017-07-17T04:27:24+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ‘जय गणेश रुग्णसेवा’ अभियानाचा प्रारंभ झाला. शारीरिक अपंगत्व असलेल्या पुण्यासह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोफत कृत्रिम हात-पाय व विविध आजारांवरील मोफत तपासण्यांचा लाभ या वेळी नागरिकांनी घेतला.
गणेश कला क्रीडा मंच येथे उद््घाटनप्रसंगी सुंदर वासवाणी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त उपस्थित होते. अभियानात पुण्यातील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे. रविवार, दि. ६ आॅगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गरजू व गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अपंगांना मोफत कृत्रिम हात व पाय बसवून देण्याची सुविधा या वेळी उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, तुळजापूरसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पांडुरंग मुंढे, धनंजय पारेकर, सुनंदा नांगरे, इंदू जैन, वैष्णवी निंबाळकर, अप्पाराव सूर्यवंशी, अँथनी शिरसाट यांसह अनेक गरजू रुग्णांनी सहभाग घेतला. संपूर्ण वर्षभर या रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
२३ जुलै रोजी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संजीव डोळे सर्व आजारांवर रुग्णांना उपचार देणार आहेत.