जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 08:02 PM2020-08-07T20:02:36+5:302020-08-07T20:03:07+5:30

राज्य व केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांचा स्तुत्य पाऊल..!

Jai Hind! Coronation-free police will give life to the victims; donate by Plasma | जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १६ जवान ठरले पात्र; सहा जणांनी केले दान

पुणे : कोरोनाशी लढा देऊन ठणठणीत झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान देणार आहेत. याची सुरूवात शुक्रवारी (दि. ८) ससुन रुग्णालयात झाली. राज्य राखीव दलाच्या सहा जवानांनी प्लाझ्मा दान केले. यापुढेही टप्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
कोरोनामुक्त नागरिकांच्या रक्तामध्ये विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून अन्य रुग्णांना दिल्यास त्यांच्यामध्येही वेगाने प्रतिकाशक्ती तयार होते. त्यामुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातूनच राज्य राखीव पोलिस दलाचे जवान पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात १६ जवान पात्र ठरले आहेत. त्यातील सहा जणांनी शुक्रवारी दान केले. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते. डॉ. तांबे यांच्या हस्ते जवानांना प्रमाणपत्र देण्यात आले.
डॉ. तांबे म्हणाले, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही प्लाझ्मा दान करणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांचे प्लाझ्मा दान सुरू होईल. एका प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे.
----------------
पुणे विभागातील सुमारे २०० जवान कोरोनाबाधित झाले होते. त्यातील ८५ जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यापैकी ६५ जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येतील. जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठविले जाईल.
- नवीनकुमार रेड्डी, पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल
------------------

Web Title: Jai Hind! Coronation-free police will give life to the victims; donate by Plasma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.