जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:05 PM2023-05-01T12:05:43+5:302023-05-01T12:13:41+5:30
ढोल ताशाचे वादन करत महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर
भानुदास पऱ्हाड
आळंदी : सातासमुद्रापार दुबई देशात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुबईत स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने पर्शियन गल्फ समुद्रात असलेल्या जगातील एकमेव सेव्हन स्टार 'बुर्ज अल अरब' हॉटेलसमोर ढोल ताशाचे वादन करत महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केले. त्यामुळे महाराष्ट्राची ही कला परदेशातही अनेकांना अनुभवता आली.
त्रिविक्रम ढोल ताशा पथक हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. सागर पाटील यांनी २०१७ साली पथकाची स्थापना केली आहे. सुरुवातीला पथकाची अगदी तीन वादकांपासून सुरुवात झाली. मात्र आजमितीला पथकामध्ये दीडशेहून अधिक कलाकार आहेत. दरवर्षी साधारण २५ ते ३० वादन करणारे हे पथक नेहमीच महाराष्ट्राची कला जोपासण्याचे काम करत आहे. याबद्दल त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक सागर पाटील यांना २०२१ साली महाराष्ट्र शासनाकडून "मराठी भाषा सम्मान" देण्यात आला आहे.
यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. यापार्श्वभूमीवर दुबईत पर्शियन गल्फ समुद्रात एका लक्झरी बोटवर 'बुर्ज अल अरब' या सेव्हन स्टार हॉटेलसमोर पाण्यात ढोल ताशाचे वादन करायचे ठरवले. त्यानुसार पथकातील २० वादकांनी महाराष्ट्रीयन पेहराव व डोक्यात फेटा परिधान करत भर समुद्रात ढोल ताशाचे वादन केले. विशेषतः या उपक्रमात महिलांनीही सहभागी होऊन ढोल ताशांचा गजर केला. दुबई मरीना येथून समुद्रमार्गे वादकांना घेऊन निघालेली बोट 'दुबई आय गँट विल' समोर वादन करीत 'बुर्ज अल अरब' या हॉटेलच्या समोर पाण्यात थांबली. याठिकाणी ढोल ताशाचे वादन करून परदेशातील महाराष्ट्रीयन जनतेला अनोख्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या पथकाने परतीचा प्रवास गाठला.
जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन#pune#MaharashtraDay#Dubaipic.twitter.com/Ke6OOnSyQA
— Lokmat (@lokmat) May 1, 2023
''परदेशात राहून महाराष्ट्राची कला, संस्कृती जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे काम आम्ही मागील पाच वर्षांपासून करत आहे. मात्र यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने आम्ही ही संकल्पना आखली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर कधीही, कोणीही असे वादन केलेले नाही. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही हा रेकॉर्ड बनवला आहे. - सागर पाटील, संस्थापक त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई.''