जय मल्हार! जेजुरीत यंदा शिखर काठ्यांचा जल्लोष नाही; कोविडमुळे यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:32 AM2021-03-01T10:32:05+5:302021-03-01T11:05:49+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीत दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते.
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत आज शिखर काठ्यांची यात्रा संपन्न झाली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी भरणारी माघ पौर्णिमेची यात्रा रद्द झाल्याने शिखरी काठ्यांचा जल्लोष नव्हता. केवळ संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या फक्त मानाच्या एकाच काठीने आज देवदर्शन उरकले.
सकाळी संगमनेरकर होलम आणि दुपारी सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या शिखरी काठ्यांनी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात,भंडाऱ्याची उधळण करत देवभेटी उरकल्या. काठीसोबत फक्त १० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता.
तीर्थक्षेत्र जेजुरीत दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. राज्यभरातून लाखांवर भाविक येथे येऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेत असतात. यात्रा दोन दिवस सुरू असते. कोविड प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासनाने ही यात्रा रद्द केली होती. यामुळे यंदा यात्रा भरली नसली तरीही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होणारी शिखरी काठ्यांचा पारंपरिक देवभेटीचा सोहळा अगदी मोजक्याच भाविकांच्या आणि केवळ मानाच्या काठीच्याच देवभेटीने संपन्न झाला.
पोलिसांनीही यात्राकाळात चार पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जेजुरीकरांनी प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला होता. यात्रा शांततेत पार पडली.