जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:48 PM2021-10-12T12:48:54+5:302021-10-12T12:49:07+5:30
जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
जेजुरी : महाराष्ट्राच्या खंडोबा भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत उत्सव साजरा केला जात आहे.
गडकोटातील बालदारीत घटस्थापना झालेली असून लोककलावंत या ठिकाणी आपली सेवा रुजू करीत आहेत. बालदारीतच लोकगीते, भक्तिगीते देवाच्या जागरणाची गाणी गात लोक कलावंत देवाचा जागर करीत आहेत. मार्तंडदेव संस्थान कडून मात्र संपूर्ण गडकोटला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गडकोटामध्ये दररोज मुख्य मंदिरात धार्मिक कार्यक्रम व नित्यपूजा होत आहे. येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेने देव दर्शन दिले जात आहे. जेजुरीचा दसरा उत्सव म्हणजे मर्दानी दसरा मानला जातो. देश परदेशातून भाविक या उत्सवाला येत असतात. मात्र यावर्षी ही कोरोना महामारीमुळे उत्सवावर मर्यादा आलेल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी उत्सव होणार नसला तरी धार्मिक विधी साधेपद्धतीने साजरे केले जाणार असल्याची माहिती देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी दिली आहे.