जय श्रीराम! अयोध्येत साकारणार श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:21 AM2023-04-05T09:21:44+5:302023-04-05T09:22:08+5:30
लहान वयातील मूर्ती श्रीकृष्णाप्रमाणे वाटत असल्याने आता तेथे प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती घडविण्यात येणार
पुणे: अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामाची लहान वयातील मूर्ती श्रीकृष्णाप्रमाणे वाटेल अशी सूचना केल्याने आता तेथे प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती घडविण्यात येत आहे, असे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सांगितले. सद्गुरू श्री जंगली महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित जंगली महाराज मंदिर उत्सवामध्ये सगुणाचे निर्गुण पाविजे या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीबाबत त्यांनी सांगितले की, अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती आहे. कारण हे रामलल्लाचे मंदिर आहे. या मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य आहे. परंतु, पाठीवर बाणाचा भाता नाही. कारण भाता हा केवळ शिकारीला जातानाच वापरला जातो. काही महिन्यांपूर्वी मी अयोध्यामध्ये गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना प्रभू श्रीरामाची अगदी लहान वयातील मूर्ती मंदिरामध्ये असू नये अशी सूचना केली. कारण प्रभू श्रीरामाची लहान वयातील मूर्ती श्रीकृष्णाप्रमाणे वाटेल, अशी सूचना मी त्यांना केली. त्या सूचनेप्रमाणे आता मूर्ती घडविण्यात येत आहे, असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले.
आपल्या मनातील कार्य सिद्धीसजाण्यासाठी माणूस विविध प्रकारच्या मूर्तींची पूजा करतो. परंतु अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ज्या मूर्तींची पूजा करतात त्या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत, त्याचे स्वरूप काय आहे, याबद्दल माहिती नसते. समाजामध्ये मूर्तिशास्त्राबद्दल प्रचंड अनास्था आहे. आपण ज्या गुणप्राप्तीसाठी देवाची पूजा करतो, त्या देवाच्या मूर्तीची तरी माहिती आपण घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.