जय श्रीरामचा जयघोष! ७ थरांचा मनोरा; गणेश मित्र मंडळाने फोडली गुरुजी तालीमची दहीहंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:29 PM2023-09-08T12:29:49+5:302023-09-08T12:30:26+5:30
मंडळाने दहीहंडी क्रेनवर ठेवली असून हंडी आणि क्रेनलाही सोनेरी रंगाची चकाकणारी सजावट
पुणे: कसबा पेठेतील गणेश मित्रमंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी गुरुजी तालीम संघाची दहीहंडी फोडली. त्यासाठी त्यांना ७ थरांचा मानवी मनोरा उभा करावा लागला. पहिल्याच प्रयत्नात रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी त्यांनी ही हंडी फोडली व जल्लोष केला. गोविंदाचे पथक थर तयार करताना नागरिक जय श्रीरामचा जयघोष करत त्यांचा उत्साह वाढवत होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हंडी फुटल्यावर सर्व गोविंदांचा सत्कार केला. उत्सव प्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे कौतुक केले. सायंकाळी ४ वाजल्यापासूनच गुरुजी तालीम मंडळाभोवती गर्दी होण्यास सुरुवात झाली. सजवलेल्या हंडीकडे पाहत सगळेच गोविंदांचे कोणते पथक हंडी फोडतील याची चर्चा करत होते.
शहरात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. मंडळाचे कार्यकर्ते आणि गोविंदाच्या उत्साहाला पावसाच्या या रिमझिमने उधाण आणले. परिसरात एकच कल्लोळ उसळला. यळकोट यळकोट जय मल्हार...सदानंदाचा यळकोट अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या थोड्याच वेळात मंडळाजवळ एका पाठोपाठ एक ढोल पथकांच्या रांगा लागल्या. दहीहंडीला सलामी म्हणून एकएक पथक खेळ दाखवू लागले.
मंडळाने दहीहंडी क्रेनवर ठेवली होती. हंडी आणि क्रेनलाही सोनेरी रंगाची चकाकणारी सजावट केली होती. त्याच्याबरोबर मध्यभागी एलईडी लाइट लावले होते. अंधार पडू लागताच या दिव्यांच्या रंगीत उजेडात हंडी झळाळू लागली. हे लाइट स्पीकर्सवर वाजत असलेल्या गाण्यांप्रमाणे फिरत होते. मंडळाचे उत्सव प्रमुख उद्योगपती पुनीत बालन, जान्हवी धारीवाल, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांचे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जयघोष करत त्यांचे स्वागत केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनीही मंडळाला भेट दिली व कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. रिल स्टार अर्थव सुदामे, दयानी पंडित, आर्यन पाठक यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
गुरुजी तालीम मंडळाचे सेलिब्रिटी
संगीतकार अजय अतुल, रिलस्टार अर्थव सुदामे, डॅनी पंडित, आर्यन पाठक, अभिनेता प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल आदींनी भेट दिली.