मनसेचेही आता जय श्रीराम, पण कारसेवकांसाठी! राज ठाकरेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:32 AM2024-01-14T11:32:58+5:302024-01-14T11:33:19+5:30
मनसेतर्फे शनिवारी सकाळी गणेश कला, क्रीडा मंचमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळावा झाला.
पुणे : अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे; पण तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी त्यासाठी कष्ट घेतले, त्यांचे स्वप्न सत्यात येत आहे, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे २२ जानेवारीला कोणालाही कसलाही त्रास न देता कारसेवकांचे स्मरण म्हणून पूजाअर्चा करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
मनसेतर्फे शनिवारी सकाळी गणेश कला, क्रीडा मंचमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळावा झाला. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना २२ जानेवारीला स्मरण दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिलाध्यक्षा वनिता बाविस्कर, अजय शिंदे, गणेश सातपुते उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘ग्रामपंचायतींबाबत गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. जगण्याची ऊर्मी ही भोवतालच्या वातावरणामुळे तयार होते. मनसेच्या हातातील सर्वांत स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांचा निधी मी स्वतः देईन, असे ठाकरे यांनी जाहीर केले.