गोळीबार प्रकरणी जयदीप तावरे यांना अटक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:16+5:302021-08-18T04:16:16+5:30
माळेगाव : गोळीबार प्रकरणात मोक्का न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आलेल्या माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा जामीन अर्ज ...
माळेगाव : गोळीबार प्रकरणात मोक्का न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आलेल्या माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १८) न्यायालयासमोर शरण येण्याचे आवाहन जयदीप तावरे यांना करण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर ३१ मे रोजी संभाजीनगर, माळेगाव येथे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणात चिथावणी दिल्याबद्दल रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक केली होती. या अटकेचे तीव्र पडसाद उमटत माळेगाव बंद व निषेध सभा झाली होती. तब्बल २३ दिवसांनंतर माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पुणे येथील न्यायालयात न्या. अग्रवाल यांनी जामीन मंजूर केला. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर जयदीप तावरे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. समर्थकांकडून चक्क जयदीप तावरेंचा दुधाने आंघोळ घालत अभिषेक केला. अनेकांनी नवस पूर्ण केले, सत्याचा विजय झाला म्हणून सोशल मीडियावर संदेश फिरत होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी जयदीप तावरे यांच्या विषयी दिलेला अभिप्राय न्यायालयाने फेटाळून जामीन नामंजूर करत पुन्हा न्यायालयात शरण येण्याचे आवाहन जयदीप तावरे यांना दिले आहेत. जामीन नामंजूर होताच गावात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. जयदीप तावरे हा स्वच्छ व चांगल्या प्रतिमेच्या व्यक्तीस गोळीबार झालेले रविराज तावरे यांनी राजकीय आकसातून गुंतवल्याने रविराज तावरेवर चौफेर टीका होत होती. रविराज तावरे यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या असतानाही जयदीप तावरे हे जनमाणसात लोकप्रिय आहेत.
चौकट
जयदीप तावरे यांचा जामीन नामंजूर केला असला तरी गावात याबाबत वेगळीच चर्चा चालू आहे. या निर्णया विरोधात जयदीप तावरे उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा आपले निर्दोषत्व सिध्द करू शकतात अशी चर्चा आहे. अर्थात, याबाबत त्यांचा निर्णय कळू शकला नाही. गेल्या तीन महिन्यांपूर्वी गोळीबार झाल्यानंतर गावातील वातावरण अतिशय खराब आहे. राजकीय इर्षेपोटी नेमका राजकीय बळी कोणाचा जाणार? येत्या नगरपंचायत निवडणुकीत कोण कोणाची राजकीय कारकीर्द संपवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.