स्थानिकांवर गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन, सर्व पक्षीय नेत्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:01 AM2018-01-07T01:01:05+5:302018-01-07T01:01:18+5:30
राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक समिती स्थापन करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कोरेगाव भीमा /तळेगाव ढमढेरे : राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक समिती स्थापन करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
१ जानेवारी रोजी समाजकंटकांनी कोरेगाव भीमा व सणसवाडी या गावांमध्ये जाळपोळ दगडफेक व मारहाण केली. यात कोट्यवधीचे नुकसान तर झालेच शिवाय सणसवाडी येथील युवक राहुल फटांगडे याचा निर्घृण खून केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद दादा ढमढेरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास दरेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वपक्षीय आंदोलन करणार
समाजकंटक महिला, मुलांवर अत्याचार करीत असताना वाहने, दुकाने जाळीत असताना स्थानिक तरुणांनी त्यांना प्रतिकार केला. असे असताना प्रशासन त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करणार असेल तर सर्व पक्षीय आंदोलन उभारले जाईल, असे उपसभापती मोनिका हरगुडे यांनी सांगितले.