"तुमची बदली झालीय..." कारागृहातून बाहेर पडताच त्याने महिला पोलिसाला घातला गंडा

By विवेक भुसे | Published: August 18, 2022 05:05 PM2022-08-18T17:05:59+5:302022-08-18T17:10:02+5:30

महिला पोलिसाला बदलीची धमकी देऊन गंडा

jailed accused man fraud lady cop as he left the yervada jail pune crime news | "तुमची बदली झालीय..." कारागृहातून बाहेर पडताच त्याने महिला पोलिसाला घातला गंडा

"तुमची बदली झालीय..." कारागृहातून बाहेर पडताच त्याने महिला पोलिसाला घातला गंडा

Next

पुणे : जित्याची खोड काही केल्या जात नाही असे म्हटले जाते. तसाच काहीचा प्रकार एका ठगाने केला. फसवणूक प्रकरणातून तो येरवडा कारागृहात होता. तेथून सुटका झाल्यावर त्याने कारागृहात असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून क्लार्क बोलत असल्याचे सांगून बदलीची धमकी देऊन गंडा घातला.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५ रा. फिरस्ता) या ठगाला अटक केली आहे. याबाबत २६ वर्षाच्या महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२२ रोजी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध विविध ठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो बाहेर आला आहे. त्याने फिर्यादी पोलिस कर्मचारी महिलेला फोन करून एडीजी (अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह) ऑफिसमधून क्लर्क इंगोळकर दादा बोलतोय असे सांगितले. त्यानंतर फिर्यादींना तुमची बदली करण्यात येत आहे. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी पाईंटवर कर्तव्यावर होता तेथील ५ ते ६ तक्रारी आल्या असून, तुमच्या सोबतच्या ड्युटी पॉईंटवरील ५ मुलींना सस्पेंड करण्यात येत आहे. मात्र मी सोल्युशन काढतो एडीजी साहेबांशी बोलतो. त्यासाठी तुम्ही माझ्या गुगल पे खात्यावर १० हजार रुपये पाठवून द्या असे सांगितले.

आरोपीने तुमची ऑर्डर काढण्यात येईल, ऑर्डर टाईप करत आहे. बाकीच्या चार मुलींची ऑर्डर टाईप केली आहे असे म्हटले. त्यामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यांनी आरोपीने दिलेल्या गुगल पे खात्यवरून ट्रान्सफर केले. दरम्यान, फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर असा कोणी क्लार्क नसल्याचे समजले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संपर्क क्रमांकावरुन अमित कांबळे यानेच हा प्रकार केल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक वारंगुळे तपास करीत आहेत.

कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आणखी काही महिला कर्मचार्यांना फोन करुन पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्याने या महिला कर्मचार्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक कसे मिळविले, याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: jailed accused man fraud lady cop as he left the yervada jail pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.