गणेशाेत्सव बंदाेबस्तात पिस्तूल बाळगणारे सराईत जेरबंद; दोन पिस्तूल, काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:50 PM2023-09-23T12:50:50+5:302023-09-23T12:51:26+5:30
पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने पकडले...
पुणे : सहकारनगर भागात पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून दाेन पिस्तूल आणि तीन काडतुसे अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. सात्विक सचिन इंगळे (वय १९), साहिल ऊर्फ सच्च्या हनीफ पटेल (वय २१, दोघे रा. पर्वती), प्रथम ऊर्फ पेंडी सुरेश म्हस्के (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलिस कर्मचारी गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण गस्त घालत होते. त्यावेळी सहकारनगर भागात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून इंगळे याला पकडले. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत पटेल आणि म्हस्के यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दोघांकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदुकुमार बिडवई, उपनिरीक्षक नितीन कांबळे, मोहसीन शेख, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.
कात्रज घाटात गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्यास अटक
भारती विद्यापीठ पाेलिसांनी कात्रज घाटातील भिलारेवाडी परिसरातून सतीश गुलाबराव शेरके (वय २३, रा. शिंदेवाडी, शिरवळ, मूळ मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन काडतुसे जप्त केली. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमाेल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मंगेश पवार, नीलेश खैरमाेडे, सचिन सरपाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.