जैन समाजाने राष्ट्रीय स्तरावर जलकार्यक्रम हाती घ्यावा : किरण बेदी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:48 PM2019-10-05T19:48:41+5:302019-10-05T19:56:31+5:30
आज देशासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे...
पुणे : जैन समाज विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करीत आहे, ही निश्चितचं वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मात्र आपल्या जीवनाचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी देखील झाला पाहिजे. यासाठी एखादा राष्ट्रीय कार्यक्रम समाजाने दत्तक घेतला पाहिजे. आज देशासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. पाणी वाचवा ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे समाजाने राष्ट्रीय स्तरावर जलकार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी केले.
श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली राष्ट्रीय महिला शाखा आणि लोकमत च्या सहयोगाने आयोजित राष्ट्रीय महिला अधिवेशनामध्ये '' जितो जिंदगी की हर जंग '' याविषयावर त्या बोलत होत्या. आचार्य शिवमुनीजी, प्रवर्तक प्रकाशमुनीजी, प्रमुख मंत्री शिरीषमुनीजी यांच्या पवित्र सान्निध्यात व युवाचार्य महेंद्रॠषीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पूना चे अध्यक्ष विजयकांत कोठारी, लखीचंद खिवंसरा, बाळासाहेब धोका, माणिक दुगड, रमणलाल लुंकड, विजय भंडारी,पारस मोदी, विलास राठोड, आदेश खिवंसरा, सुदर्शन बाफना, राजेश सांकला, श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षा विमल बाफना, रमेशलाल गुगळे, संजय सांकला यांच्या उपस्थितीत सीडीचे प्रकाशन करण्यात आले.
किरण बेदी म्हणाल्या, जैन समाज विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करीत आहे. मात्र आपल्या ताकदीचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करावा. यासाठी एखादा वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम दत्तक घ्यावा.
अधिवेशनाच्या निमित्ताने सुंदर अधिवेशन आणि सुंदर नाव ही स्पर्धा झाली. यात दोनशे महिला सहभागी झाल्या. नवी सांगवी येथील सीमा कटारिया ' शिव शरणा वीर चंदना' यांनी सूचित केलेले नाव अधिवेशनाला देण्यात आले. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी आणि विमल बाफना, विजय कांत कोठारी आदींच्या उपस्थितीत उदघाटन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी बाफना यांनी केले.
..................
पुरूषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी नाहीत. महिलांना स्वातंत्र्य असावे असे म्हणतात. पण महिलांना स्वातंत्र्य दिले गेले आहे, फक्त ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला- विमल बाफना, राष्ट्रीय अध्यक्षा महिला शाखा, श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स