Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:48 IST2024-12-18T19:48:25+5:302024-12-18T19:48:57+5:30
खोलवर चढाया व अचूक पकडी यावर जयपूरने जास्त भर दिला होता, मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी घेतली होती

Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय
पुणे : जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरू बुल्सवर ३६-२६ असा शानदार विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. मध्यंतराला त्यांच्याकडे १५-११ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूर व बंगळुरू यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. जयपूर संघाने सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यावर लक्ष केंद्रित केले होते. खोलवर चढाया व अचूक पकडी यावर त्यांनी जास्त भर दिला होता. मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच बंगळुरूने लागोपाठ चार गुणांची कमाई करीत १५-१५ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर संघाने १८-१७ अशी एक गुणाची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवत आपली आघाडी आणखी वाढवली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे २८-११ अशी आघाडी होती. त्यानंतर लगेच त्यांनी लोण चढविला आणि आपली बाजू बळकट केली.
ही स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या जयपूर संघाकडून आज अर्जुन देशवाल व सोमबीर मेहरा यांनी पल्लेदार चढाया केल्या. अर्जुन याने आपले नाव सार्थक ठरविताना एकाच चढाईत तीन गडी बात करण्याची किमया ही दाखवून दिली.बंगळूर संघाकडून अजिंक्य पवार व परदीप नरवाल यांचा खेळ कौतुकास्पद होता.