पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:42 AM2018-01-31T11:42:33+5:302018-01-31T11:47:10+5:30
किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे.
पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात घराण्यांची एक परंपरा चालत आली आहे. संगीतविश्वात अजरामर झालेली अनेक प्रतिभावंत कलाकार मंडळी ओळखली जातात, ती त्यांच्या घराण्यांच्या गायकीवरूनच. आता किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. या घराण्याचे सौंदर्य उलगडणारी आणि घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे.
घराण्याबरोबरच गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक शिष्यांनी पुढाकार घेतला. त्याचेच प्रतीक म्हणजे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी किराणा घराण्याच्या समृद्ध गायकीचा वारसा पुढे नेण्यासाठी सुरू केलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव.’ त्यांची ही गानपरंपरा त्यांचे शिष्य पुढे नेत आहेत.
विशेष म्हणजे, गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या शिष्यांनी घराण्याचा सांगीतिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. किशोरीतार्इंचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून संगीताचे शिक्षण घेणाऱ्या राधिका जोशी-रे यांच्या फर्ग्युसन रस्त्यावरील छोट्याशा जागेत भारतीय अभिजात संगीताला वाहिलेली ही गॅलरी साकारली जात आहे. उस्ताद अल्लादिया खाँ यांनी जयपूर-अत्रौली घराण्याची परंपरा निर्माण केली. भास्करबुवा बखले, भूर्जी खाँ, केसरबाई केरकर, वामनराव सडोलीकर, मल्लिकार्जुन मन्सूर, निवृत्तीबुवा सरनाईक, मोगूबाई कुर्डीकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. उल्हास कशाळकर, धोंडुताई कुलकर्णी आणि गानसस्वती किशोरी अमोणकर ही या अभिजात सांगीतिक घराण्याच्या दरबारातील अलौकिक अशी रत्ने.
या घराण्याच्या सौंदर्याबरोबरच घराण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग, घराण्याची माहिती आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके असा अमूल्य ठेवा या गॅलरीमध्ये जतन केला जाणार आहे. सध्या कॅटलॉगिंग करण्याचे काम सुरू आहे. ‘गानसरस्वती यशोगाथा’ गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे अभिजात स्वर म्हणजे केवळ श्रवणीय अनुभूती नसते, तर संगीताची ती एक चिंतनशील आणि आध्यात्मिक बैठक असते.
या गॅलरीमध्ये जयपूर अत्रौली घराण्याच्या किशोरी अमोणकर यांच्या गानसंपदेच्या लिखित, मौलिक ठेव्यांसह अर्ध्या तासाच्या दृकश्राव्य मैफलींचा आस्वाद रसिकांना दि. ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ‘गानसरस्वती यशोगाथा’ या कार्यक्रमात घेता येणार आहे. जागा अपुरी असल्याने कार्यक्रमासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. या कार्यक्रमाची घोषणा गानसरस्वती महोत्सवात केली जाणार असल्याचे राधिका जोशी यांनी सांगितले.
गॅलरी मार्चमध्ये होणार खुली
मार्चमध्ये ही गॅलरी खुली करण्याचा विचार असून, यामध्ये छोटेखानी मैफली, नामवंत कलाकारांच्या मुलाखती, संगीताच्या शोधनिबंधांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम करण्याचा मानस असल्याची माहिती ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या राधिका जोशी-रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.