जीवनशैली सुधारतेय पण वातावरण प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 06:24 AM2017-07-29T06:24:01+5:302017-07-29T06:24:04+5:30
पुणे शहराची जीवनशैली सुधारत आहे. गेल्या काही वर्षांत विमानप्रवास करणाºया पुणेकरांची संख्या दुपटीने वाढली आहे. वर्षात तब्बल ६५ लाख जणांनी प्रवास केला आहे
पुणे : पुणे शहराची जीवनशैली सुधारत आहे. गेल्या काही वर्षांत विमानप्रवास करणाºया पुणेकरांची संख्या दुपटीने वाढली आहे. वर्षात तब्बल ६५ लाख जणांनी प्रवास केला आहे. वाहनांची संख्याही ३३ लाखांवर गेली आहे. प्रतिमाणसी एकापेक्षा जास्त वाहने आहेत. मात्र, त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. मात्र वाढत्या बांधकामांमुळे शहराच्या उष्णतेत वाढ होत असल्याचा निष्कर्ष या महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदवण्यात आला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेला पुणे शहराचा २०वा पर्यावरण अहवाल अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी खास सभेत महापौर मुक्ता टिळक यांना सादर केला. आता २० सप्टेंबर २०१७ रोजी या अहवालावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल.
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात तब्बल ६५ लाख १२ हजार २०५ पुणेकरांनी विमानप्रवास केला असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. शहरीकरण व जीवनशैली सुधारत असल्याचा निष्कर्ष यावरून नोंदवण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर पुण्याचे वातावरण प्रदूषित होत असल्याचे म्हटले आहे. २०० पानांच्या या अहवालात वृक्षगणनेपासून वाहनांच्या संख्येपर्यंतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात महापालिका क्षेत्रात ४२ लाख ९७ हजार ८७ चौरस मीटर चटई क्षेत्र बांधकामांना परवानगी देण्यात आली. मागील वर्षीपेक्षा बांधकामांच्या परवानग्यांमध्ये १० लाख ९४ हजार २३१ चौरस मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणजेच पृष्ठभागीय व उपपृष्ठभागीय उष्णतेत वाढ होत असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. जमिनीच्या वापरातील बदल, निसर्गात होत असलेला मानवी हस्तक्षेप तसेच सिमेंटचे वाढते जंगल याला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याशिवाय घरगुती गणेश मुर्तीचे घरातच विसर्जन करण्यासाठी महापालिका घेत असलेला पुढाकार, त्याचा होत असलेला फायदा, शहराच्या जैविक विविधतेची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी चित्रप्रदर्शन, त्यातून जनजागृती या पालिकेच्या उपक्रमांची माहिती अहवालात आहे. महापौरांनी अहवाल स्वीकारतेवेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले उपस्थित होते. महापालिकेच्या पर्यावरण कक्षाचे प्रमुख मंगेश दिघे व त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी हा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी कोणत्याही खासगी सल्लागार कंपनी किंवा संस्थेचे सहकार्य घेतलेले नाही.
पुण्यातील वाहनांच्या संख्येने तर विक्रमच केला आहे.
मार्च २०१७ पर्यंत पुणे शहरातील फक्त नोंदणीकृत वाहनांची संख्याच ३३ लाख २७ हजार ३७० झाली आहे. शहरातील लोकसंख्येशी या संख्येचे गुणोत्तर प्रतिमाणशी १ पेक्षा जास्त वाहने असे असल्याचे दिसून येत आहे. हवेतील प्रदूषण वाढवण्यात वाहनांची वाढती संख्या हे महत्त्वाचे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.
1शहरात डेंगीची साथ पसरत असल्याचे सध्या दिसत असले तरी अहवालात मार्च २०१७ पर्यंत सन २०१६ च्या तुलनेत स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सौर ऊर्जेला उत्तेजन देण्यासाठी महापालिकेकडून सौर ऊर्जेचा वापर करणाºयांना मिळकत करात ५ ते १० टक्के सवलत मिळते. एकूण ५७ हजार ६५ नागरिकांनी याचा लाभ घेतला असून सौर उर्जेच्या वापराविषयी जागरूकता वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 2ऊर्जा बचतीसाठी महापालिकेने सन २०१० पासून मार्च २०१७ पर्यंत शहरात ७९ हजार ९ एलईडी दिवे बसवले आहेत. तीनचाकी रिक्षाचालकांना सीएनजी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून त्याअंतर्गत सन २०१७ पर्यंत १५ हजार ६९८ रिक्षांना अनुदान देण्यात आले आहे.