‘जलयुक्त शिवार’ला सिध्दिविनायक पावला...
By admin | Published: April 22, 2015 11:01 PM2015-04-22T23:01:28+5:302015-04-23T00:33:05+5:30
रत्नागिरी जिल्हा : जिल्हाधिकाऱ्यांकडे एक कोटीचा धनादेश सुपूर्द
रत्नागिरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने जिल्ह्यासाठी एक कोटीचा निधी दिला आहे. आज या निधीचा धनादेश अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्याकडे या न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी सुपूर्द केला.
महाराष्ट्रातील पाणीटंचाई दूर करणे व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखी महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अभियान शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था लोकसहभाग, खासगी उद्योजक यांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटीप्रमाणे अर्थसहाय करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी राणे यांनी दिली.
यावेळी त्यांनी न्यासाच्या शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध समाजोपयोगी कामाचीही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत विश्वस्त प्रवीण नाईक, हरीश चव्हाण उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४७ गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६३ कोटी ५८ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विविध खात्यातून १४ कोटी ५२ लाख निधी उपलब्ध झाले आहेत. उर्वरित निधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक डी. जी. देसाई यांनी यावेळी दिली.
अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी न्यासाचे आभार मानले. ते म्हणाले, या अभियानासाठी या निधीतून काम करण्यासाठी न्यास गावांची निवड करणार आहे. त्यामुळे या निधीवर त्यांचे नियंत्रण रहाणारच आहे. पण त्याचबरोबर एकूण निधीतून होणारी कामे पारदर्शी पद्धतीने होतील आणि हे अभियान यशस्वी होईल, यासाठी जिल्हा प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा पाणीटंचाईच्या समस्येतून नक्कीच बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)