Pune | आंबी पुलासाठी साडेतीन तास कुडकुडत जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:08 PM2022-12-12T19:08:21+5:302022-12-12T19:10:22+5:30
नदीपात्रात पाण्यात कुडकुडत थांबत साडेतीन तास आंदोलन...
तळेगाव दाभाडे (पुणे) :इंद्रायणी नदीवरील आंबी पूल वाहतुकीसाठी खुला करावा, या मुख्य मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीपात्रात पाण्यात कुडकुडत थांबत साडेतीन तास आंदोलन करण्यात आले. अखेर इंद्रायणी नदीवरील आंबी पुल व रस्ता हलकी वाहने व दुचाकीसाठी येत्या १०दिवसांत वाहतुकीसाठी खुला करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाला लगेच सुरुवात केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सोमवारी (दि. १२) सकाळी दहा वाजता सुरु केलेले जलसमाधी आंदोलन दुपारी दीड पर्यंत चालले. यावेळी नितीन मराठे, नवलाख उंबरे गावचे माजी सरपंच नागेश शिर्के, वराळे गावचे उपसरपंच जनार्दन पारगे, माजी उपसरपंच निलेश शिंदे, ग्राम पंचायत सदस्य योगेश मराठे, दादाभाऊ मराठे, प्रभाकर मराठे, जितेंद्र मराठे, सुनील मराठे, वैभव हिंगणे, शरद भोंगाडे, प्रदीप बनसोडे, प्रशांत मराठे, रवींद्र घोजगे, आकाश मराठे आदींनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. जवळपास साडेतीन तास आंदोलन चालले. यावेळी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नितीन मराठे यांनी दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळचे शाखा अभियंता नंदकुमार खोत यांनी पुढील दहा दिवसांमध्ये दुचाकी व हलक्या वाहनांसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू असे लेखी आश्वासन दिले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीबा मराठे, माजी नगरसेवक संतोष शिंदे, ॲड. वैभव हिंगणे, सचिन मराठे, आकाश मराठे, संदीप गोंदेगावे, संदीप कदम, संदीप घोजगे, भरत घोजगे, बाबा घोजगे यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.