भिडे पुलाजवळ अडकलेली जलपर्णी पुण्याबाहेरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:18+5:302021-07-24T04:09:18+5:30
पुणे : जोरदार पावसामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून पडल्याने, संपूर्ण रस्ता बंद झाला होता़ ...
पुणे : जोरदार पावसामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून पडल्याने, संपूर्ण रस्ता बंद झाला होता़ मात्र ही जलपर्णी पुणे महापालिका हद्दीबाहेरील नदीपात्रातील आहे, ती पावसाच्या पाण्यामुळे वाहून आली असल्याचा अजब दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला आहे़
दरम्यान पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्याच्या कामाविषयी विचारले असता, प्रशासनाकडून नदीपात्रातील जलपर्णी केवळ कापली जाते, ती काढली जात नाही असेही सांगण्यात आले आहे़
गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण साखळी परिसरात तथा पुणे शहरातही जोरदार पाऊस कोसळत आहे़ यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यावर बाबा भिडे पूल येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत आली़ ही जलपर्णी एवढी होती की, यामुळे येथे काही काळ हौशानवशांकडून सेल्फी पॉर्इंटच बनला होता़ दरम्यान धरणातून होणारा विसर्ग कमी केला असता, ही जलपर्णी भिडे पुलाजवळ अडकूनच राहिली़ त्यामुळे महापालिका प्रशासनाने अडकलेली ही जलपर्णी काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या व तीन जेटींग मशिनच्या सहाय्याने ही जलपर्णी काढण्यात आली़
भिडे पुलाजवळील जलपर्णीबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना विचारले असता, जलपर्णी बाहेर काढून टाकण्याचा खर्च मोठा असल्यामुळे ती कापून काढून ती नदीतूनच पुढे प्रवाहाबरोबर वाहून जाईल याकरिता निविदा काढली गेल्याचे सांगितले़ तसेच भिडे पुलाजवळ अडकलेली जलपर्णी ही महापालिका हद्दीच्या बाहेरची असून, ही जलपर्णी महापालिकेने काही वेळातच हटविली असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------