जांभेकरांची ध्येयवादी पत्रकारिता आजही अनुकरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:52+5:302021-02-24T04:12:52+5:30
डॉ. राजा दीक्षित : मसापमध्ये ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन पुणे : ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या आरंभकाळात बाळशास्त्रींचे स्थान मोठे होते. त्यांच्या ...
डॉ. राजा दीक्षित : मसापमध्ये ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन
पुणे : ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या आरंभकाळात बाळशास्त्रींचे स्थान मोठे होते. त्यांच्या अवघ्या ३३ वर्षांच्या जीवन‘दर्पणा’त तत्कालीन प्रबोधनाच्या सामर्थ्य-मर्यादांचे दर्शन घडू शकते. त्यांचे बहुस्पर्शी कार्य आणि ध्येयवादी पत्रकारिता आजही अनुकरणीय आहे,’ असे मत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीनिमित्त 'बाळशास्त्री जांभेकर आणि महाराष्ट्रातील प्रबोधन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रवींद्र बेडकिहाळ, प्रकाश पायगुडे आणि अमर शेंडे उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, 'महाराष्ट्रातील आधुनिकतेचे आरंभकालीन प्रतिनिधी, प्रबोधनाचे अग्रदूत, मराठी वृत्तपत्रकारितेचे जनक आणि नेमस्त उदारमतवादी सुधारक या नात्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर बाळशास्त्री जांभेकर यांनी आपली मुद्रा उमटवली. इंग्रजी राजवट आल्यावर तिला प्रतिसाद देण्या-या नवशिक्षितांच्या पहिल्या पिढीचे आणि नवोदित मध्यमवर्गाचे ते प्रतिनिधी होते. बाळशास्त्रींची शैक्षणिक, भाषिक आणि वृत्तपत्रीय कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा काळ आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या कार्याला स्वाभाविकपणे अभिजन मर्यादा पडली होती. पण अशा मर्यादांमधूनच महाराष्ट्रातील प्रबोधन आकाराला आले. ती एक ‘ऐतिहासिक स्वाभाविकता’ म्हणता येईल.’ प्रकाश पायगुडे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.