जांभूळवाडी, धानवलीचे पुनर्वसन कागदावर
By admin | Published: July 5, 2017 02:32 AM2017-07-05T02:32:47+5:302017-07-05T02:32:47+5:30
पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड
सूर्यकांत किंद्रे/लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेहेण, नीरादेवघर धरण भागातील धानवली व आंबवडे खोऱ्यातील जांभूळवाडी गावांचा समावेश आहे. तीनही गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे.
भोरपासून ३५ किलोमीटरवर भोर-पांगारी-धारमंडपरोड पासून ४ किलोमीटर उंच डोंगरावर डेहेण हे सुमारे ४५० लोक वस्तीच ४७ कुटुंब असलेल गाव असून गावाशेजारीच एक धनगरवस्ती आहे. तीनही बाजूंनी गावाला डोंगराचा वेडा असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तर डोंगरातील दगडमाती वाहून घरांना धोका होऊ शकतो. गावाला फार वर्षापूर्वी रस्ता झाला आहे. मात्र आत्ता रस्त्याचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे वाहने उन्हाळ्यातच दिसतात. पावसाळ्यात रस्त्याने धड चालताही येत नाही.आरोग्य विभागाचा कर्मचारी गावात कधीच येत नाहीत. रस्ता नसल्याने कोणी आजारी पडल्यास झोळीत घालून चालत ४ किलोमीटर पांगारीला आणून तिथून एसटीकिंवा खासगी गाडीने भोरला आणावे लागते. येथील धनगरवस्तीला विद्युत पुरवठा करण्याचे काम मंजूर आहे. मात्र, वनविभागामुळे स्वातंत्र्याला ६५ वर्षे होऊनही अद्याप वीज पोहचलीच नाही. त्यामुळे अंधारातच राहावे लागत असल्याचे किसन दगडु दुरकर व बाळासो कंक यांनी सांगितले.
गावात १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून शिक्षकही अधून मधूनच येत असतात, त्यामुळे मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात डोंगर उतारावरून उताराची पाणीपुरवठा योजना केली आहे. मात्र, ती खराब झाल्याने पावसाळ्यात डोंगरावरील झऱ्यांचे पाणी तर दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. दर वर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेची दुरुस्ती करुन पाणीटंचाई दूर करावी, असे सरपंच संदीप लक्ष्मण दुरकर यांनी सांगितले.
नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडपासून चार किलोमीटर आत रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागून धानवली हे ४०० लोकवस्तीचे महादेवकोळी समाजाचे गाव आहे. काही कुटुंबांचे डोंगरातून खाली दोन किलोमीटर सपाटावर पुनर्वसन केले आहे, मात्र अजूनही काही कुटुंबे डोंगरातील कड्याखालीच राहत आहेत. वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून कायमच वंचित आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरातील दगडमाती पडून घरांची पडझड होऊ शकते किंवा जीवितहानी होण्याची भीती आहे. येथील लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. अशीच अवस्था कोर्ले गावांतर्गत असलेल्या जांभूळवाडीची येथील आहे.