जांबुत फाटा-बेल्हे रस्त्याच्या साईडपट्ट्या उखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:58+5:302021-08-24T04:13:58+5:30
वडगाव कांदळी : जांबुत फाटा-बोरी बेल्हा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ आहे. काही दिवसांपासून या मार्गावरील साईडपट्ट्या उखडल्या गेल्या ...
वडगाव कांदळी : जांबुत फाटा-बोरी बेल्हा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ आहे. काही दिवसांपासून या मार्गावरील साईडपट्ट्या उखडल्या गेल्या आहेत. साईडपट्ट्या खोल झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या साईडपट्ट्या मुरुमाने भराव्या, अशी मागणी संदीप बढे, विश्वास बढे, रघुनाथ बढे, प्रवीण बढे, योगेश बढे, आशिष घाडगे, संजय बढे, शामराव बढे या ग्रामस्थांनी केली आहे.
जांबुत फाटा ते बेल्हे हा रस्ता पुणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. साईडपट्ट्या खोल असल्याने अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. तसेच काही ठिकाणी असललेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. साईडपट्टी खोल असल्याने अनेक वेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाची होताना दिसून येते. संबंधित ठेकेदाराची रस्ता पूर्णत्वानंतर दुरुस्ती करण्याची तरतूद असूनही ठेकेदार टाळाटाळ करत आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक दिवसांपासून साईडपट्ट्यांवर मुरूम भरण्यात यावा, अशी मागणी नगदवाडी, वडगाव कांदळी, साळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रजिमा क्रमांक- ८ जांबुत फाटा-बेल्हे या रस्त्याच्या रुंदीकरणाला गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली असून, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. तातडीने या रस्त्याचे रुंदीकरण झाले असते तर अनेक अपघात टाळता आले असते. मंजुरी मिळाली असूनही काम होत नसल्याने प्रशासनाने लक्ष घालून तातडीने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आंदोलनाचा इशारा
रस्ता रुंदीकरणाला मंजुरी मिळाली असून काम मात्र सुरू होत नाही. रस्त्याच्या कडेला एक ते दोन फूट खोल साईडपट्ट्या आहेत. यामध्ये वारंवार अनेक अपघात घडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने यामध्ये लक्ष घालून तातडीने मुरूम टाकावा, खड्डे बुजवावेत, अन्यथा बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.
विश्वास बढे
ग्रामस्थ, नगदवाडी.
२३ वडगाव कांदळी
जांबुत फाटा-बेल्हे रस्त्याच्या उखडलेल्या साईडपट्ट्या.