जांबुतफाटा- बेल्हा रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:47+5:302020-12-08T04:09:47+5:30
राजुरी: जांबुतफाटा ते बोरी बेल्हा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. ...
राजुरी: जांबुतफाटा ते बोरी बेल्हा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. हे खड्डे तात्काळ बुजवावेत व साईट पट्ट्यांना मुरम टाकावा अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रामदास पवार यांनी केली आहे. लवकरात लवकर डागडुजी न केल्यास ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
जांबुतफाटा ते बेल्हे हा रस्ता पुणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला होता. परंतु, दुरुस्ती नंतर अवघ्या काही दिवसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊनही अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बाभळीची मोठमोठी झाडे आहेत, बाभळीचे काटे रस्त्यावर पडून दुचाकी पंक्चर होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक या रस्त्याने केली जात आहे. साईडपट्ट्या खोल असल्याने अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. संबंधित ठेकेदाराची रस्ता पूर्णत्वानंतर दुरुस्ती करण्याची तरतूद असूनही ठेकेदार टाळाटाळ करत आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत अनेक दिवसापासून खड्डे असल्याने ते तात्काळ बुजवण्यात यावे, साईडपट्ट्यांवर मुरूम भरण्यात यावा व रस्त्याच्या बाजूला धोकादायक असणारी झाडे तोडण्यात यावी अशी मागणी नगदवाडी, वडगाव कांदळी, साळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो
०७ राजुरी
जांबुतफाटा ते बेल्हा रस्त्याची झालेली दुरावस्था