जॅमरने नागरिक झाले जाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:00 AM2018-09-16T03:00:28+5:302018-09-16T03:00:55+5:30
खासगी प्रवासी वाहतुकीकेडे अर्थपूर्ण कानाडोळा, सामान्य नागरिकांना मात्र त्रास
हडपसर : वाहतूक शाखेची जॅमर कारवाई जोरदार सुरू आहे. या कारवाईतून हडपसर पोलीस ठाण्यासमोरील पोलिसांची वाहनेही सुटली नाहीत. मात्र, जॅमर लावल्यानंतर कोणाशी संपर्क करायचा, हे लिहिण्याची तसदी जॅमर कारवाई करणाऱ्या अधिकाºयांनी घेतली नाही. त्यामुळे ज्या वाहनांना जॅमर लावला, त्यांना तासन्तास वाहतूक पोलिसांची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. या ठिकाणी नो-पार्किंगचा फलक नाही, तरीसुद्धा कारवाई केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बसथांब्यासमोर आणि रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी ट्रॅव्हल्स बस, खासगी प्रवासी वाहने, पॅगो, मॅजिक, सहाआसनी आणि तीन आसनी रिक्षा यांच्यावरही त्याच तडफेने कारवाई करण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयाच्या परिसरामध्येही वाहतूककोंडी होते. त्यामुळे मुलांचा जीव गुदमरून जातो. वाहतूक पोलिसांकडून लायसन्स, हेल्मेट, वाहनांची अस्सल कागदपत्रे, सीटबेल्ट लावला आहे, सिग्नल तोडला का हे पाहून कारवाई केली जात आहे.
खासगी ट्रॅव्हल्स, पॅगो, रिक्षा, सहाआसनी, मॅजिक या वाहनांना का सूट दिली जाते. अनेक रिक्षाचालकांकडे परवाना नाही, परमिट नाही, पासिंग न करताच रिक्षा चालवल्या जातात, ही बाब वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने गौण आहे का, याचे उत्तर गुलदस्त्यात
आहे. दुचाकीला जॅमर लावले की आपले काम झाले, अशी भावना वाहतूक पोलिसांची झाली आहे. जॅमर लावल्यानंतर त्या वाहनचालकांच्या अडचणी का समजून घेत नाही. पीएमपी डेपोसमोर बसथांब्यावर सर्रास रिक्षा उभ्या राहतात, त्यांच्यावर अशी कारवाई करण्याचे धाडस का दाखविले जात नाही, अशी विचारणा नागरिकांनी केली आहे.
गाडीतळावर कारवाई कधी?
हडपसर पीएमपी डेपो की रिक्षा अड्डा असे वृत्त गुरुवारी (दि. १३) दै. लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. पदपथावर रिक्षा स्टँड आहे, काही रिक्षा स्टँडवर पाच रिक्षांना परवानगी आहे, तेथे दहा-बारा रिक्षा उभ्या राहतात. वाहतुकीला अडथळा ठरतात. तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. दुचाकीवर मात्र प्राधान्याने कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस का सरसावतात, असा सवाल नागरिकांना पडला आहे.
जॅमर लावलेला वाहनचालक दंड भरण्यासाठी दोन दोन तास वाट पाहत ताटकळत उभा असतो, याबाबत वाहतूक पोलीस अधिकारी म्हणतात, आम्हाला अनेक कामे आहेत. वाहतूककोंडीत अडकलेलो असतो. नागरिकांच्या सोयीसाठीच आम्ही कारवाई करतो.