बेशिस्त वाहनांना जॅमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:33 PM2018-08-30T23:33:54+5:302018-08-30T23:34:40+5:30
मागील दोन महिन्यांपासून बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे. तसेच बेशिस्त
बारामती : मागील दोन महिन्यांपासून बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे. तसेच बेशिस्त वाहनचालकांवर देखील कारवाई केली जात आहे. आता शहरांतर्गत रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यास मदत होणार आहे.
बेशिस्त वाहतुकीबाबत मागील दोन महिन्यांपासून शहर पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सर्वच प्रमुख चौकांमध्ये सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी पोलीस व होम गार्डच्या मदतीने वाहतूक नियंत्रण केले जाते. परिणामी शहरातील वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर गर्दी असते. प्रमुख चौकांमध्ये होणारी कोंडी टाळण्यासाठी शहर पोलीस ठाण्याने कंबर कसली आहे. पंचायत समिती चौक, टिसी महाविद्यालय परिसरात पोलिसांनी चारचाकी वाहनांवर कारवाई करीत जॅमर लावले. प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी दररोज थांबत असल्याने नागरिकांकडूनही नियमांचे पालन होऊ लागले आहे.
शहरातील सिनेमा रस्ता, इंदापूर रस्ता, तीन हत्ती चौक, कचेरी रस्ता, खाटीक गल्लीचा परिसर अशा अनेक मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केली जातात. वाहने लावून वाहनमालक बिनधास्त निघून जातात. रस्त्याच्या मधेच उभ्या केलेल्या अशा वाहनांमुळेकोंडीमध्ये भर पडते. पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही त्यात सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे आता बेशिस्त पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाला थेट जॅमर लावले जात आहेत. जॅमर लावल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात येत दंड भरूनच आपले वाहन न्यावे लागत आहे. त्यामुळे वाहन पार्किंग करताना काही अंशी शिस्त लागणार आहे.