जनधन अफवेमुळे महिलांची झुंबड!
By admin | Published: January 5, 2017 03:29 AM2017-01-05T03:29:35+5:302017-01-05T03:29:35+5:30
शासनाच्या वतीने महिलांच्या जनधन खात्यात ५ हजार ते ५ लाखांपर्यंत रक्कम जमा होणार, अशी अफवा पसरल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरात असलेल्या
लोणी काळभोर : शासनाच्या वतीने महिलांच्या जनधन खात्यात ५ हजार ते ५ लाखांपर्यंत रक्कम जमा होणार, अशी अफवा पसरल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरात असलेल्या युनियन बँक आॅफ इंडिया शाखेत आज सकाळपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या जनधन खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात येणार असून ती ५ हजार ते ५ लाखांच्या पटीत असल्याची चर्चा महिलावर्गामध्ये रंगली होती. त्यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा होणार, या कल्पनेने महिला हरखून गेल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला ज्यांचे खाते नव्हते त्या आपले नुकसान होणार, म्हणून नाराज झाल्या होत्या.
रविवारच्या सुटीनंतर बँक उघडण्याच्या अगोदरच या बँकेसमोर महिलांनी मोठी गर्दी केली होती. ती बँक बंद होण्याची वेळ संपेपर्यंत कायम होती.
आज दुपारी बँकेला प्रत्यक्ष भेट दिली असता महिलांची रांग बँकेच्या बाहेरपर्यंत आलेली होती. या रांगेत अशिक्षित महिलांसमवेत सुशिक्षित महिलाही उभ्या असलेल्या दिसल्या. यांच्यामध्ये पैसे खात्यावर जमा होणार असल्याची चर्चा चालली होती.
यासंदर्भात युनियन बँक आॅफ इंडिया कदमवाकवस्ती शाखेचे व्यवस्थापक पी. एस. शितोळे यांची भेट घेऊन या महिलांच्या खात्यात खरेच पैसे जमा होणार आहेत का? अशी विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून अथवा मुख्य शाखेकडून तशी कसलीही माहिती मिळाली नसल्याने याबाबत आपण अनभिज्ञ आहोत.
महिला मोठ्या प्रमाणात खाते उघडण्यासाठी आमच्या शाखेत येत आहेत. आम्ही त्यांचे जनधन खाते उघडत आहोत, अशी माहिती शितोळे यांनी दिली. (वार्ताहर)