जनता दरबार आयुक्तांच्या कक्षात
By admin | Published: June 14, 2014 01:17 AM2014-06-14T01:17:01+5:302014-06-14T01:17:01+5:30
नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पोलीस आयुक्तांचा सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता थेट आयुक्तांच्या कक्षात भरणार आहे
पुणे : नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पोलीस आयुक्तांचा सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता थेट आयुक्तांच्या कक्षात भरणार आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडताना गैरसोयीचे होऊ नये म्हणून आयुक्तांशी वैयक्तिक पातळीवर आता तक्रारदारांना बोलता येणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच पोलीस आयुक्तांनी काढला आहे.
पोलीस आयुक्तालयामध्ये दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत जनता दरबार असतो. स्थानिक पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास अनेक नागरिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडतात; परंतु आयुक्तालयाच्या पहिल्या मजल्यावर भरणाऱ्या या दरबारावेळी अन्य तक्रारदार आणि पोलिसांसमोर बोलताना अनेकांची अडचण व्हायची. तसेच आपला मुद्दा थेट मांडणे तक्रारदार टाळत असत, त्यामुळे तक्रारदारांची ही गैरसोय टाळण्यासाठी एकेका तक्रारदाराला आयुक्तांच्या कक्षात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
ज्या वेळी पोलीस आयुक्त उपलब्ध नसतील, अशा वेळी
सह पोलीस आयुक्त तक्रारदारांना भेटणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना आपला मुद्दा थेट
पोलीस प्रमुखांसमोरच मांडता
येणार आहे. न्यायाच्या अपेक्षेने
तक्रारी घेऊन येणाऱ्या
नागरिकांच्या पदरात या
निर्णयामुळे काय पडते, हे पाहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)