‘जनाई-शिरसाई’चे पाणी पुन्हा रोखले

By Admin | Published: September 13, 2016 01:26 AM2016-09-13T01:26:12+5:302016-09-13T01:26:12+5:30

येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले.

'Janaai-Shirsai' water stopped again | ‘जनाई-शिरसाई’चे पाणी पुन्हा रोखले

‘जनाई-शिरसाई’चे पाणी पुन्हा रोखले

googlenewsNext

शिर्सुफळ : येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले. मात्र, ग्रामस्थांचा रोष कायम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच ग्रामस्थांनी हे पाणी पुन्हा बंद केले. आधी शिर्सुफळ तलावात पाणी सोडा, त्यानंतरच पाणी उचला, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासनाला हात हालवत माघारी फिरावे लागले.
‘लोकमत’ने सोमवारी ग्रामस्थांनी जिरायती भागाला पाणी रोखले, असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. जनाई-शिरसाई या उपसा सिंचन योजनेतून जिरायती भागाला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र, तलाव पूर्ण भरल्याशिवाय अन्य गावांना पाणी सोडू नये, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तर, पाणी नाही म्हणून जिरायती भागातील १७ गावांमधील शेतकऱ्यांनी चाऱ्यांची कामे स्व:खर्चातून सुरू केली आहेत. आता पाण्यासाठी बारामती तालुक्यातच संघर्ष सुरू झाला आहे.
शिरसाई उपसा सिंचन योजनेतून शिर्सुफळ येथून जिरायती भागातील १७ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपूर्वी खडकवासला कालव्याच्या माध्यमातून हा तलाव भरला होता. मात्र, जिरायती भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे या तलावातील पाणी १७ गावांना सोडले होते. योजनेतून पंपगृहाला पाणी मिळत नसल्याने तलाव कोरडा पडला. त्यामुळे ग्रामस्थ व सरपंच जवाहरलाल सोनवणे यांनी पंपगृह व जिरायती भागात सुरू असणारा पाणीपुरवठा बंद केला.
प्रशासनाने सोमवारी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ मागणीवर ठाम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच जिरायती १७ गावांना सुरू केलेला पाणीपुरवठा बंद केला. जोपर्यंत शिर्सुफळ तलाव भरला जात नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करू दिला जाणार नाही, असाही ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. (वार्ताहर)

Web Title: 'Janaai-Shirsai' water stopped again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.