इंदापूरमध्ये जनआक्रोश मोर्चा
By admin | Published: May 3, 2017 02:02 AM2017-05-03T02:02:56+5:302017-05-03T02:02:56+5:30
राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या
इंदापूर : राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. २) येथे बोलताना दिला.
या मोर्चाच्या निमित्ताने भाजपा सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गळ्यात डाळिंब, तूर, कांद्याचे हार घालून मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण कर्ज माफी मिळावी, विद्युत पंपाचे वीज बील माफ व्हावे, तालुक्यातील पाण्याची टंचाई, खडकवासला व भाटघर धरणातील पाणी मिळावे, डाळिंब, कांदा, तूर व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, मागेल त्याला काम व पाणी मिळाले पाहिजे, भीमा व नीरा नदीवरील बंधारे पाण्याने भरण्यात यावेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यात १ कोटी ६५ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाही. शेतीला पाणी नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीज बिल माफ झाले पाहिजे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. नाकर्त्या नेतृत्वामुळे ५५ लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती व दौंड तालुक्यांना पाणी मिळाले.इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. अॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी सभापती विलासराव वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर प्रतीक्षा जामदार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. (वार्ताहर)