Pune: कात्रजच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जनता दरबार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:54 PM2023-06-07T12:54:28+5:302023-06-07T12:55:07+5:30
कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...
पुणे :पुणे महापालिकेत १९९७ साली कात्रज गावाचा समावेश होऊनही ते अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी कात्रज विकास आघाडीच्या वतीने दि. ८ जून रोजी सांयकाळी ५ वाजता कात्रज भाजीमंडई येथे आमदार, खासदार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन केले आहे.
कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या जनता दरबाराला खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे , आमदार चेतन तुपे, संजय जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार योगेश टीळेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कात्रजची सर्वांत मोठी समस्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात आहे. आतापर्यंत याठिकाणी अनेकांचा अपघाती मृत्यू झाला असून, जायबंदी झालेल्यांची संख्या हजारांमध्ये आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या वतीने वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यान बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे नियोजन चुकले असून, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. भविष्यातील मेट्रोचा विचार न करताच या पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी वंडरसिटी ते खडीमशीन चौकापर्यंत उड्डाणपूल बांधल्यास भूसंपादनासाठी आवश्यक असलेला सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी वाचणार असून, अवजड वाहनांनादेखील निर्धोक प्रवास करता येणार आहे, असेही नमेश बाबर यांनी सांगितले.