JanataCurfew : पुणेकरांनी करुन दाखवलं ; रस्ते झाले निर्मनुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 02:17 PM2020-03-22T14:17:51+5:302020-03-22T14:20:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र पुण्यात दिसून आले.
पुणे ः काेराेनाला राेखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज रविवार ( 22 मार्च) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले हाेते. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन माेदी यांनी केले हाेते. त्याला पुणेकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. शहरातील रस्ते सकाळापासूनच सामसूम हाेते. रस्त्यावर फक्त पाेलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी लाेकं दिसून आली. सर्वत्र शांतता पसरली हाेती. शहरात केवळ पक्षांचा किलकिलाट ऐकू येत हाेता.
काेराेनाचा प्रसार भारतात वाढत असल्याने साेशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक आहे. असे झाले तरच काेराेनावर मात करता येऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीयांना आज घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले हाेते. त्याला पुण्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुण्यातील सर्व सेवा सुविधा, दुकाने, आस्थापने या आधीच बंद करण्यात आली हाेती. आज जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. शहरातील सर्व प्रमुख रस्ते सुनसान हाेते. त्याचबराेबर सर्व एसटी स्थानके, बस स्थानकांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. नेहमी धावत असणारं पुणे आज शांत झाल्याचे दिसून आले.
पाेलीसांकडून शहरातील विविध चाैकांमध्ये बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. काेणी उगाचच रस्त्यावर फिरताना दिसल्यास पाेलीस त्यांना घरी जाण्याचे आवाहन करत हाेते. पीएमपीच्या बसेस माेकळ्या धावत हाेत्या. सर्व रस्ते, गल्ल्या, महामार्ग आज शांत झाल्याच दिसून आले. पुणे बंगळूर हायवेवर सुद्धा आज शुकशुकाट दिसून आला. पुण्याचे पाेलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी पुण्यातील रस्त्यांचा आढावा घेतला. पुणेकरांनी या जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद दिला असून 99. 99 टक्के लाेकांनी घरी राहणेच पसंत केल्याचे ते म्हणाले, त्याचबराेबर अत्यावश्यक सेवा देणारी लाेक केवळ रस्त्यावर असल्याचे ते म्हणाले. त्याचबराेबर पाेलीसांचा बंदाेबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आला असून गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले.
पुण्याच्या प्रदूषणात घट
पुण्यात सर्वाधिक टु व्हिलर असल्याने माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असते. त्याचबराेबर चारचाकी, पीएमपी, इतर वाहने असे सर्व मिळून 40 लाखांहून अधिक वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषणात पुणे नेहमीच आघाडीवर असते. आज मात्र रस्त्यांवर वाहनेच नसल्याने पुण्याच्या प्रदुषणात माेठी घट झाली. त्याचबराेबर ध्वनी प्रदूषणही जवळजवळ शून्य टक्क्यांवर आले आहे. शहरात सर्वत्र केवळ शांतता आणि पक्षांचे आवाज ऐकू येत हाेते.