आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार
By निलेश राऊत | Published: December 21, 2023 04:08 PM2023-12-21T16:08:51+5:302023-12-21T16:09:42+5:30
आकर्षक पदपथांसह, झाडांच्या निगराणीसाठी, झेब्राक्रॉसिंग पट्टे, जलवाहिन्यांसाठी केलेली खोदाई दुरूस्ती आदी कामांसाठी दोन कोटींची निविदा
पुणे: पुणे शहरात आजपर्यंत खड्डे न पडलेला रस्ता म्हणून नावलौकिक मिळविलेल्या जंगली महाराज रस्त्याच्या (जे.एम.रोड) सुशोभिकरणासाठी म्हणजेच रस्त्याच्या कडेला असलेल्या आकर्षक पदपथांसह, झाडांच्या निगराणीसाठी, झेब्राक्रॉसिंग पट्टे, जलवाहिन्यांसाठी केलेली खोदाई दुरूस्ती आदी कामांसाठी दोन कोटींची निविदा काढण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव पथ विभागाने स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पाच वर्षांकरिता ही निविदा असणार असून, यामध्ये झाडांची देखभालही पथ विभागाकडूनच केली जाणार आहे. पुण्याच्या इतिहासामध्ये चाळीस वर्षाहून अधिक काळ जंगली महाराज रस्ता खड्डेमुक्त राहिला आहे. या रस्त्यावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभागाकडून रस्त्याच्या बाजूने खोदाई करण्यात आली. दरम्यान या खोदाईच्या दुरूस्तीची कामे केली गेली असली तरी आता पुढे त्याच्या डागडुजीची गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यावरील गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या दरम्यानच्या देखभाल दुरूस्तींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचे एस्टीमेट तयार करण्यात आले असून, या कामासाठी ७ निविदा आल्या आहेत. यापैकी ३ निविदा पात्र ठरल्या असून, २ कोटी ५ लाख रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. याव्दारे पाच वर्षे या रस्त्याची संबंधित ठेकेदार कंपनीकडून देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे.
स.गो.बर्वे चौकापासून डेक्कन चौकापर्यंतच्या जंगली महाराज रस्त्याचे १९७६ मध्ये डांबरीकरण करण्यात आले आहे. चार ते पाच वर्षांपुर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत या रस्त्याचा मॉडेल रस्ता म्हणून विकास करण्यात आला. त्याचे पदपथ प्रशस्त केले गेलेत. पदपथावर बसण्यासाठी कट्टे, झाडे लावण्यात आलीत. एवढेच नव्हे तर सायकल ट्रॅकही करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्त्यावर ठिकठिकाणी शोभेसाठी प्लान्टेशन केले आहे. त्यांची देखभाल दुरूस्ती तसेच या रस्त्यावर झेब्रा कॉसींगचे पट्टे मारण्यासाठी पाच वर्षासाठी निविदा काढण्यात आली आहे. यापुर्वीच्या ठेकेदाराची कामाची मुदत संपल्याने नव्याने निविदा काढण्यात आली आहे.- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग पुणे महापालिका.