उलगडणार सावरकर गाथा!; शनिवारवाडा प्रांगणात १३ जानेवारीला अनोखा कार्यक्रम ‘यशोयुतां वंदे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:43 PM2018-01-11T12:43:41+5:302018-01-11T12:49:00+5:30
संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल.
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अपरिचित पैलूंची झलक कलाविष्कारातून पाहायला मिळणार आहे. संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल. पुण्यातील १०० हून अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कायम दोन टोकांच्या भूमिकांमधून पाहिले गेले आहे. प्रत्यक्षात, व्यक्ती म्हणून ते किती महान होते, हा पैलू कायम दुर्लक्षित राहिला आहे. सावरकरांची विज्ञानदृष्टी, समाजसुधारणेतील पुढाकार, जातिनिर्मूलनाची चळवळ असे विविध कंगोरे ‘यशोयुतां वंदे’मधून अनुभवता येणार आहेत’, अशी माहिती सारंग कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साठे, दीपा सपकाळ, गायिका अर्चना पंतसचिव, नृत्यांगना रसिका गुमास्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संहिता दीपा सपकाळ यांनी लिहिली असून, सामाजिक सलोखा वाढवण्यावर सावरकरांनी कशा प्रकारे भर दिला, याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अडीच तासांच्या या कार्यक्रमात नृत्य, गाणी, पोवाडे, शिल्प, साहित्य, रांगोळी यांची गुंफण करण्यात आली आहे. अभिजित धोंडफळे शिल्प साकारणार असून, सोमनाथ भोंगळे रांगोळी रेखाटणार आहेत.
या कार्यक्रमासाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, नृत्यगुरू पं. मनीषा साठे, साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, लेखक डॉ. राजेंद्र खेर, आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिकेची परवानगी
शनिवारवाड्यावरील एल्गार परिषदेबाबत झालेल्या गदारोळानंतर ‘यशोयुतां वंदे’ या कार्यक्रमासाठी सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह सादरीकरणाचा यात समावेश नसल्याची खात्री पटवून देण्यात आल्यानंतर मंगळवारी महानगरपालिका आणि पोलिसांतर्फे परवानगी देण्यात आली.