जानेवारीतील गेल्या ११ वर्षातील सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:37+5:302021-01-08T04:35:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जानेवारी महिन्यात पुण्यात नेहमीच गुलाबी थंडी पडलेली असते. पण, यंदा हवामानाने सर्वाचे अंदाज चुकविले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जानेवारी महिन्यात पुण्यात नेहमीच गुलाबी थंडी पडलेली असते. पण, यंदा हवामानाने सर्वाचे अंदाज चुकविले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आकाश ढगाळ असतानाच गुरुवारी सायंकाळी अचानक जोरदार पावसाच्या सरी सुरु झाल्या. सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ११ वर्षात जानेवारी महिन्यात झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०१० रोजी ०.७ मिमी आणि २५ जानेवारी २०१४ रोजी ०.१ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली होती.
कर्नाटक किनारपट्टीपासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी पहाटे काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सारसबाग परिसरात पाऊसाची भुरभुर सुरु झाली. जोरात पाऊस येणार असे वाटत असतानाच ढग पांगले. सायंकाळी साडेचार वाजता शिवाजीनगर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी आल्या. त्यामुळे प्रथमच जानेवारी महिन्यात पुण्यात रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहताना दिसून आले. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शहराच्या पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर दिसून आला. तसेच येरवड्यात सुमारे तासभर पावसाच्या सरी पडत होत्या. कात्रज परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडला.
पुणे शहरात ८ व ९ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० व ११ जानेवारीला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.