शुद्ध पाण्यासाठी जपानी संजीवनी
By admin | Published: December 5, 2014 05:13 AM2014-12-05T05:13:14+5:302014-12-05T05:13:14+5:30
शहरातील मुळा-मुठा योजनेच्या संवर्धनासाठी जपान मधील जायका कंपनीने अनुदान देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे केवळ या दोन नद्यांचे संवर्धन होणार नाही
पुणे : शहरातील मुळा-मुठा योजनेच्या संवर्धनासाठी जपान मधील जायका कंपनीने अनुदान देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे केवळ या दोन नद्यांचे संवर्धन होणार नाही तर, या योजनेमुळे खडकवासला धरणापासून उजनी धरणापर्यंतच्या नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या तब्बल १२६ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
तसेच पुढील १३ वर्षांतील शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरही १०० टक्के प्रक्रिया होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या नदी सुधार योजनेसाठी जपानच्या जायका कंपनीने सुमारे १ हजार कोटी २० लाख रुपये देण्यास बुधवारी सहमती दर्शविली आहे.
आराखड्यास लवकरच मान्यता
जायका कंपनीने दोन महिन्यांपूर्वी पुण्यात नदीपात्राचे सर्वेक्षण केले होते. तसेच महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याचाही अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी स्वतंत्र आराखडा तयार केला असून, तो पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी घेऊन राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला तो सादर होईल. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया होऊन पुणे महापालिकेशी जायकचा करार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. (प्रतिनिधी)