मॉरिशसच्या बांधवांचा जेजुरीत जागरण गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:02 AM2018-04-09T01:02:07+5:302018-04-09T01:02:07+5:30
सन- १८६४मध्ये महाराष्ट्रतून जाऊन मॉरिशस येथे स्थायिक झालेल्या भोसले, गायकवाड यांच्या पाचव्या पिढीतील ३० सदस्य खंडेरायाच्या जेजुरीत आठवड्यापूर्वी आले असून, जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) प्रांगणात शनिवारी (दि. ७) रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत या मॉरिशसवासीय मराठी बांधवांनी चक्क स्वत:च खंडेरायाचा जागरण गोंधळ घातला.
जेजुरी : सन- १८६४मध्ये महाराष्ट्रतून जाऊन मॉरिशस येथे स्थायिक झालेल्या भोसले, गायकवाड यांच्या पाचव्या पिढीतील ३० सदस्य खंडेरायाच्या जेजुरीत आठवड्यापूर्वी आले असून, जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) प्रांगणात शनिवारी (दि. ७) रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत या मॉरिशसवासीय मराठी बांधवांनी चक्क स्वत:च खंडेरायाचा जागरण गोंधळ, तळी-भंडार, लंगर तोडणे, खंडोबाची-देवीची गाणी, जात्यावरची गाणी, भारुड सादर करीत मॉरिशसमध्येही जोपासलेल्या मराठी परंपरा व धार्मिक संस्कृतीचे जेजुरीत दर्शन घडवले.
या धार्मिक विधींचे विशेष आकर्षण म्हणजे पुरुषवर्ग मराठी संस्कृतीच्या पारंपरिक वेशामध्ये, तर महिलावर्गाने नऊवारी साडी, नथ, अंबाडा असा मराठमोळा वेश परिधान केला होता, १८६४मध्ये सातारा जिल्ह्यातील पाली जवळच्या एका छोट्याशा गावातील भोसले, गायकवाड बोटीवर खलाशी म्हणून काम करत असतानाच मॉरिशसला स्थायिक झाले, त्या वेळी त्यांच्याकडे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायासह तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबाबाईचे टाक होते. मॉरिशसमध्ये स्थायिक या परिवारांनी आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही, मॉरिशसमध्येही या कुलदैवतांचे सर्व सण, उत्सव मोठ्या श्रद्धेने तेथे केले जातात. १५० वर्षांपूर्वी मराठा समाजातील आमचे पूर्वज मॉरिशस येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी येथील धार्मिक विधी, सण-उत्सवांची परंपरा जोपासली होती, तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. मॉरिशसची लोकसंख्या १२ लाख असून, सुमारे ३० हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये आषाढी, कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री, आदी उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावास्या, चंपाषष्ठी उत्सव साजरे केले जातात. या वेळी अनिल भोसले लक्ष्मण, मीनाक्षी भोसले लक्ष्मण, वृशांत म्हाडकर गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पडूं पंढरकर, हिराबाई लखना आदी मॉरिशसचे भाविक आणि श्रीमार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर आदी उपस्थित होते.
मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली, तरी मराठी बांधव मात्र शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत ५० मिनिटांचा मराठीचा तास घेतला जातो, त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण- उत्सवांचे महत्त्व आदी शिकवले जातात. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहे. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने छत्री मंदिरासमोर कार्यक्रमासाठी सुसज्ज मांडव, स्पीकर व्यवस्थेची सोय करण्यात आली होती.