जेजुरीत १७ तास मर्दानी दसरा
By admin | Published: October 13, 2016 07:27 AM2016-10-13T07:27:40+5:302016-10-13T07:27:40+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेला हा सोहळा
जेजुरी (पुणे) : तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेला हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.
नवरात्राची सांगता आणि घराघरांतील घट उठल्यानंतर काल (दि. ११) सायंकाळी सहा वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी आणि बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. भंडाऱ्याच्या उधळणीत खांदेकरी मानकऱ्यांनी देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी उचलली, गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकऱ्यांनी पालखीत ठेवल्या आणि सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले.
तर रात्री ९ वाजता मार्तंडभैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळाही सीमोल्लंघनासाठी निघाला. दोन्ही मंदिरांच्या मध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्हीकडील विश्वस्त मंडळांकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय करण्यात आली होती.
मध्यरात्री जेजुरीगडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठाराच्या सोहळ्याने सुसरटिंगी टेकडी सर केली. रात्री दीडच्या सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीत दोन्ही सोहळ्यांतील उत्सवमूर्तींची देवभेट उरकली अन् सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. (वार्ताहर)