दूषित पाण्यामुळे वाढताहेत कावीळचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:21 AM2017-07-28T06:21:29+5:302017-07-28T06:21:31+5:30
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यातून लहान मुलांना संसर्ग होऊन कावीळ उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात
पुणे : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यातून लहान मुलांना संसर्ग होऊन कावीळ उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात. काही कारणाने पिण्याच्या अथवा वापरातील पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्यास लहान मुलांमध्ये काविळीचे प्रमाण वाढते. पाणी उकळून देणे, वेळच्या वेळी लसीकरण आणि स्वच्छता अशा उपायांमधून या दिवसांमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दूषित पाण्यामुळे कावीळ अर्थात हिपॅटायटिस ‘अ’चा संसर्ग होतो. लहान मुलांमध्ये हा प्रकार अधिक आढळतो. ‘ब’ व ‘क’च्या तुलनेने कमी धोकादायक असला, तरी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. दूषित पाणी आणि अन्नातील विषाणूंमुळे हा विकार होतो. यकृतातील पेशींना इजा झाल्याने त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेले द्रव्य त्वचा तसेच हातापायांची नखे अशात साचून राहते. त्यामुळे शरीराला एक प्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही याचा निचरा होत असल्याने लघवीही पिवळी होते. काविळीचे लवकर निदान व उपचार होणे
आवश्यक असते.
लसीकरणाबाबत जागृती आवश्यक
अर्भकांना वेळेवर लसीकरण केल्यास कावीळ होण्याचा धोका टळतो. हिपॅटायटिस अ या प्रकाराची कावीळ दूषित पाण्यातून होते. सरकारी वेळापत्रकाप्रमाणे नवजात अर्भकांना दुसरा, तिसरा आणि सहाव्या महिन्यात हिपॅटायटिस बी ची लस दिली जाते. हिपॅटायटिस अ ची लस महाग असल्याने ती अद्याप सरकारी लसीकरण वेळापत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध असते. एक वर्षे वयाच्या पुढील बालकांना ही लस दिली जाते. पालकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.
शाळांनी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. पालकांनी कावीळ झाल्यास मुलांना किमान तीन आठवडे शाळेत पाठवू नये. योग्य औषधोपचार, पूर्ण विश्रांती आणि साखरेचे सेवन यामुळे कावीळ आटोक्यात येऊ शकते.
दूषित पाणी, अस्वच्छता, संसर्ग ही काविळीची प्रमुख कारणे असल्याने या काळात पाणी उकळून पिणे, कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, काविळीचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
पावसाळ्यात दूषित आणि गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. पाण्यामार्फत संसर्ग होत असल्याने विशेषत: लहान मुलांमध्ये कावीळ उद्भवण्याची जास्त शक्यता असते. लहान मुलांमध्ये सुरुवातीला ताप येणे, थकवा, चिडचिड, भूक न लागणे, मूत्रातील पिवळेपणा, पोटात दुखणे, यकृताला सूज अशी लक्षणे दिसून येतात. रक्त तपासणी आणि लघवी तपासणी करून काविळीचे निदान करता येते.
- डॉ. तुषार पारीख, बालरोग तज्ज्ञ
लहान मुले बºयाचदा बाहेरचे पाणी पितात, उघड्यावरचे अन्नपदार्थ खातात. दूषित पाणी आणि अन्नातून त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लवकर संसर्ग होतो. उलटी होणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा अशी लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसू लागल्यास पालकांनी सुरुवातीला मुलांना पिवळी लघवी होते का, हे तपासणे गरजेचे असते.
- डॉ. संध्या भिडे,
बालरोग तज्ज्ञ