जावडेकर, कुठे आहेत व्हेंटिलेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:59+5:302021-04-23T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाग्रस्त पुण्याला केंद्र सरकार व्हेंटिलेटर्स देईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी१४ दिवसांपूर्वी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाग्रस्त पुण्याला केंद्र सरकार व्हेंटिलेटर्स देईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी१४ दिवसांपूर्वी केली. ते व्हेंटिलेटर्स कुठे आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, पुण्याची अवस्था रोज बिकट होत चालली आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र राजकारणातच मश्गूल आहेत. प्रदेशाध्यक्ष असलेले कोथरूडचे आमदार पुण्यात बघायला तयार नाहीत. सिद्धार्थ शिरोळे व सुनील कांबळे हे दोन आमदार पुणेकरांना वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या प्रचाराला गेले. खासदार असलेले गिरीश बापट कुठे गेले, त्यांनाच ठाऊक आणि जावडेकर फुकटची आशा लावून गेले.
केंद्र सरकार व्हेंटिलेटर्स कधी देणार. हे जावडेकरांनी पुन्हा एकदा पुण्यात येऊन सांगावे, अशी मागणी करून जोशी म्हणाले, आपत्तीच्या काळातच लोकप्रतिनिधींची कसोटी लागत असते. त्यात भाजपचे लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्राला केंद्र सरकारचे सर्वतोपरी सहकार्य राहील असेही जावडेकर यांनी सांगितले होते. मागील १४ दिवसांतील पुण्यातील रुग्णांची आकडेवारी पहा आणि आधी पुण्यासाठी व्हेंटिलेटर घेऊन या, असे जोशी म्हणाले.