दौंड रेल्वे ट्रॅकचा प्रश्न सुटणार- जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:17 AM2018-12-11T02:17:48+5:302018-12-11T02:18:05+5:30
रेल्वेने दौंडमार्गे प्रवास करताना दौंड जंक्शनवर रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. प्रवाशांचे सुमारे ३५ ते ४० मिनिटे वाया जातात.
पुणे : रेल्वेने दौंडमार्गे प्रवास करताना दौंड जंक्शनवर रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. प्रवाशांचे सुमारे ३५ ते ४० मिनिटे वाया जातात. रेल्वे स्थानकाची लांबी वाढविण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पुढील आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. या पुढील काळात इंजिन बदलण्याची वेळ येणार नाही. परिणामी प्रवाशांचा विनाकारण वाया जाणारा वेळ वाचणार आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी सांगितले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, आमदार बाबूराव पाचर्णे, माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, पुणे रेल्वे स्टेशन येथे पाच एस्केलेटर बांधण्यात येणार आहेत. येत्या ३ ते ४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. लघु उद्योजकांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा योजनेतून पुणे जिल्ह्यातील ६ लाख ६० हजार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी ६ हजार कोंटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. वार्षिक बारा रुपये भरून विमा उतरवणाऱ्या नागरिकांची संख्या बारा लाख एवढी आहे.
पोस्ट आॅफिसमध्ये बँकेत मिळणाºया सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. देशातील काही शहरांतील पोस्टात या सुविधा सुरू असून, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८९१ पोस्ट कार्यालयांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिणामी बँक नसणाºया गावांमध्ये पोस्टल बँक सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.