"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:49 AM2024-06-24T10:49:23+5:302024-06-24T10:55:40+5:30

Pune : पुण्यात पुन्हा एकदा सर्रासपणे ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jayant Patil criticism that Pune is getting bad name due to BJP Shinde group government | "पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

Pune Drug Case : ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबल उडाली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकीत हॉटेलमध्ये तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ रविवारी समोर आला होता. या व्हिडीओवरुन विरोधकानी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. यानंतर आता या प्रकरणात पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचं निलंबन करण्यात आले आहे. तसेच संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप शिंदे गटाच्या सरकारमुळे पुणे बदनाम होत असल्याची टीका केली आहे.

पोर्श अपघात प्रकरणानंतर पुण्यातील बार आणि पब्जवर प्रशासनाने कारवाई केली होती. अशातच फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमध्ये सर्रास ड्रग्सचे सेवन केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसत आहेत. त्यामुळे पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचे समोर आलं आहे. तसेच या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यावरुनच जयंत पाटील यांनी पुणे हे ड्रग्ज व पब्जचे माहेरघर असल्याचे म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला.

"गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून  देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे. अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच आता पब्जमध्ये ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचे समोर आलं आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाऊंज उर्फ एल३ हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता. या पबमध्ये तरुण- तरुणी मद्यपान करत होते तर शौचालयात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर केलेल्या कारवाईचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आलं आहे.

Web Title: Jayant Patil criticism that Pune is getting bad name due to BJP Shinde group government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.