जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:17+5:302021-06-06T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मात्र खेडमधील फोडाफोडीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मात्र खेडमधील फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात खेड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राज्यात आपण एकत्र असून, समन्वयाने महाविकास आघाडी सरकार सुरू आहे. मात्र, याच दरम्यान खेडमध्ये असा प्रकार होणे योग्य नाही. हे प्रकरण पहिल्यांदा जयंत पाटलांना सांगितले होते; पण त्यांनी काहीच केले नाही. आता अजित पवारांनी तरी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील खेड-राजगुरूनगर येथील पंचायत समितीतील राजकारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. हा स्थानिक पातळीवरचा वाद अगदी वरिष्ठांपर्यंत पोहचला आहे. याचवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून थेट खेड गाठले आणि याबाबतीत त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत थेट अजित पवारांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
राऊत म्हणाले, खेड पंचायत समितीच्या सभापतींवर आलेला अविश्वास ठराव हा सरळसरळ शिवसेनेवर अन्याय आहे. सेनेचे सदस्य पळवून नेणं, फोडणं हे कोणी आमिष दाखवलं? ज्यांच्याबरोबर गेले त्यांनी दाखवलं की अन्य कुणी ? अशी संधी आम्हालाही मिळू शकते; पण आम्ही त्यांना त्यांच्या सरकारला समजावायला सांगू. या प्रकरणाचे आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यापैकी कोणावरही खापर फोडलेले नाही. फक्त अजित पवारांनी याप्रकरणी लक्ष घालावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो.
चाैकट
काय आहे प्रकरण ?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुद्ध तीन अशा मतांनी मंजूर झाला. २४ मेला सभापतीविरुद्ध शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. मात्र, या बंडखोर सदस्यांना राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांची फूस असल्याची चर्चा आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.