आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:17 AM2023-05-19T10:17:44+5:302023-05-19T10:20:02+5:30
सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले...
पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आताच निवडणुका घेतल्यास विधानसभेत भाजपचे ६० पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक निकालामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लवकर होईल, याविषयी शंका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पाटील म्हणाले, राज्यात ध्रुवीकरण होणार नाही. लोकांना विकास हवा आहे. महागाई कमी करणारे निर्णय हवे. देशात सध्या जे सुरू आहे, ते नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे एकहाती सत्ता दिली. मात्र, त्याचा योग्य वापर करीत नाही, हे स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या निवडणुका घेतल्यास भाजपला ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते पडणार नाहीत, असे मी विश्वासपूर्वक सांगतो. त्याचप्रमाणे दंगली नियंत्रण करता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.
‘ईडी’ला सामोरे जाणार
‘ईडी’ची नोटीस आली आहे. येत्या २२ तारखेला चौकशीला सामोरे जाणार आहे; पण ज्या कंपनीशी काहीच संबंध नाही. त्यांनी नोटीस का पाठविली आहे, त्याची माहिती घेत आहे. मात्र, एजन्सीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असेही पाटील म्हणाले.