'पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात'
By महेश गलांडे | Published: February 9, 2021 08:24 AM2021-02-09T08:24:21+5:302021-02-09T08:26:08+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.
मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आरोप करतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यानंतर, मनसेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या पुणे शहराच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज होती, म्हणूनच का खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी, म्हणून आपण प्रयत्न करत होतात, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. ''जयंत पाटील आज मंत्री आहेत, ऊर्जा मंत्रीपदी आपल्या सरकारमधील मंत्री असताना, बीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे, सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,'' असे मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना म्हटलंय.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे, त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावरुन, मनसैनिक नाराज झाले असून आपला रोष व्यक्त करत आहेत.
भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!
इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले होते.
‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले होते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेतो. मात्र, त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला होता.