मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:05 PM2022-09-19T12:05:26+5:302022-09-19T12:07:28+5:30
राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट..
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकार्यक्षमतेमुळेच महाराष्ट्रात येणारा वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेला आहे. यासाठी दिल्लीतूनही दबाव आला हाेता. महाराष्ट्रातील ३ ते ४ लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पुण्यात द डेक्कन शूगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे प्रचारासाठी विदर्भात गेले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या पक्षासाठी काम करावे. त्यांनी तसे केले, तर आनंदच होईल, असेही पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले...
- सरकारमध्येच मतभिन्नता असेल, त्यामुळेच सरकार स्थापन होऊनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेनात. त्यामुळे जिल्ह्यांतील अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत.
- शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आले आहेत. त्यांची एक परंपरा आहे. आता शिवसेनेतून कोणी फुटून बाहेर पडले असेल, तर त्यांनी त्यांचा मेळावा दुसऱ्या मैदानावर घ्यावा. परंपरागत क्लेम शिवसेनेचाच आहे, शिंदे गटाने वेगळ्या ठिकाणी मेळावा घ्यावा.
राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट
ईडी प्रताप सरनाईक यांच्या मागे लागली होती. आता त्यांच्यात कोणताही दोष नसल्याचा निष्कर्ष ईडीने काढला आहे. त्यांचे प्रकरण बंद केले जात आहे. हे परिवर्तन का झाले, हे देशाला समजत आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचे हे उदाहरण आहे. राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट होते, असेही जयंत पाटील म्हणाले.