Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत
By राजू इनामदार | Published: September 9, 2024 04:08 PM2024-09-09T16:08:22+5:302024-09-09T16:08:52+5:30
येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको
पुणे : राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे. येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असे स्पष्ट मत राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. नेत्यांची राजकीय विश्वासार्हता हाही अतिशय महत्त्वाचा विषय येत्या काळात असेल असेही ते म्हणाले.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर बोलताना पाटील यांनी महाराष्ट्रासमोरील आर्थिक, सामाजिक तसेच अन्य अनेक विषयांवरील आव्हाने उलगडत त्यांचा सामना येत्या काळात करावा लागेल असे सांगितले. पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष सुनीत भावे यांनी प्रास्तविक केले. सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी स्वागत केले. अश्विनी जाधव-केदारी यांनी सूत्रसंचालन केले.
पाटील म्हणाले, ‘राज्याची स्थापना झाली त्यावेळी दूरदृष्टी असणारे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी अनेक निर्णय घेतले व त्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जलद विकास झाला. भौगोलिकदृष्ट्या राज्याला असलेले महत्त्व व सामाजिक सौहार्द यामुळेही ते शक्य झाले. आता देशातील अनेक राज्यांमध्ये विमानतळ झाले, बंदरे झाली, रस्ते तयार झाले, त्यामुळे आता स्पर्धा आहे. म्हणूनच राज्याला राजकीय आर्थिक सामाजिक अशा सर्वच स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी. तसे होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे, सामाजिक सौहार्द खराब करणारी वक्तव्ये सातत्याने होणे, निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे अशा गोष्टी होत आहेत.’
राज्याच्या विकासाला हे सर्व मारक आहे, असे पाटील म्हणाले. शाळांमध्ये मुलांवर कोणते संस्कार होतात हेही महत्त्वाचे आहे. अर्बन सोसायटीज नव्याने नव्या परिसरात करायला हव्यात. पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत जाणार आहे, त्यावर उपाययोजना करायला हवी. वाहतूक व्यवस्थेवर काम व्हायला हवे. या सर्व आव्हानांचा सामना करेल असे राजकीय नेतृत्वही हवे. त्यांची जनतेच्या मनातील विश्वासार्हता महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भावे यांनी आभार व्यक्त केले.
मोठ्या पवारांच्या मनात काय आहे? हे ओळखणे अवघड आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे यांच्या मनात काय आहे, ते मला ओळखता येते व माहितीही आहे; पण ते मी सांगणार नाही, असे पाटील यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
तात्पुरत्या योजना बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नावही घेतले नाही, मात्र, त्यांचा रोख याकडेच होता. तुमचा याला विरोध आहे का? असे थेट विचारले असता त्यांनी ज्या महिलेला आत्यंतिक गरज आहे, त्यांना मदत करायला हवी, आमची सत्ता आल्यास अशा महिलांना आम्ही मदत वाढवून देऊ असे ते म्हणाले.