राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 12:13 PM2018-04-29T12:13:43+5:302018-04-29T14:04:04+5:30
राज्यातला महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती.
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मावळते अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेला शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर वळसे पाटील यांनी पाटील बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची सूचना अनिल देशमुख यांनी केली तर राजेश टोपे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांनी निवड झाली असून त्यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सूचना मांडली तर हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित होते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आलाय. परंतु गेल्या काही दिवसांतील राजकीय परिस्थिती पाहता या निवडीला उशीर झालाय. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगला दबदबा निर्माण केलाय. विशेषतः नुकत्याच करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली. शिवाय सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुद्द्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाशी जोडलेला पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याची पक्षाला गरज आहे.
अशातच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे असे दोन आक्रमक चेहरे पक्षाकडे आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत या दोघांची नावे आघाडीवर असून, त्यांच्यापैकी जयंत पाटलांचं नाव निश्चित मानलं जातंय. सध्या मुंडे हे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत चोख विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. धनंजय मुंडेंनी प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला अनेकदा धारेवर धरलं आहे. तसेच त्यांच्या भाषणांनाही सोशल मीडियावरही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच जातीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि ओबीसी मतपेटीसाठीही त्यांच्या नावाचा विचार गेला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाटील हे पक्षात अनुभवी असून त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव जास्त आहे. त्यामुळे त्यांचाही पर्याय खुला आहे. याशिवायही काही नावे डोळ्यांसमोर असून शरद पवार हे स्वतःच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.