जयंत पाटील भाजपात जाणार? शरद पवारांनीच दिला ईडीचा संदर्भ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:59 PM2023-08-14T15:59:29+5:302023-08-14T16:11:41+5:30
जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता.
मुंबई – शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्या का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. यावेळी जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नाही. या भेटीवर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं, ही भेट काका-पुतण्याची होती, कौटुंबिक होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या भेटीनंतर अद्यापही चर्चा सुरूच आहेत. त्यातच, जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने पुन्हा जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चा घडत आहेत.
जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ईडीची भीती घालून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपच शरद पवार यांनी केला.
पुण्यातील आमच्या बैठकीत अजिबात राजकीय चर्चा नव्हती. जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आल्याचे मला समजले. सत्तेचा गैरवापर करुन काही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनाही अशा नोटीसा आल्या. त्यामुळे, ते भाजपासोबत जाऊन बसले. आज तोच प्रयत्न जयंतराव यांच्यासोबत करण्याची भूमिका घेतलेली दिसते. पण, मला खात्री आहे की, त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असे म्हणत जयंत पाटील हे आपल्यासोबतच असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भातही भाष्य केलं. काँग्रेसच्या नेतृत्वाला आम्ही बोलावलं आहे. पण, कोण कोण येणार याबद्दल अद्याप आमच्याकडे त्यांची नावे आली नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. तर, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रश्नावर मला माहिती नाही, सध्या आम्ही जे आहोत तेच मला माहिती आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
ईडी नोटीसवर पाटील यांचं स्पष्टीकरण
जयंत पाटील म्हणाले की, भेटीबाबत काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही. ही गुप्त भेट नव्हती. मी शरद पवारांसोबत गेलो होतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही. कालच्या भेटीचा आणि ईडीच्या नोटिसीचा काही संबंध नाही. त्याचसोबत एका कंपनीच्या व्यवहाराबद्दल माझ्या बंधूंना ईडीची नोटीस आली आहे. ४ दिवसांपूर्वी ते चौकशीसाठीही गेले होते. ईडीने बोलावले, आवश्यक ती माहिती घेतली. त्याचा आणि कालच्या भेटीचा संबंध नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याची गरज नाही. भेटीगाठी होत असतात, माझी भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे, असं पाटील यांनी म्हटले आहे.
मी शरद पवारांसोबतच
दरम्यान, प्रत्येक आमदार मंत्री होऊ शकतो. मला ऑफर असल्याच्या बातम्या चर्चेत असतात. पण अशा बातम्या फारशा मनावर घेऊ नका. मी शरद पवारांसोबत आहे तुम्ही मनात काही विचार करू नका असाही मिश्किल टोला जयंत पाटील यांनी पत्रकारांना लगावला.