भोर नगराध्यक्षपदी जयश्री शिंदे
By Admin | Published: August 28, 2015 04:32 AM2015-08-28T04:32:27+5:302015-08-28T04:32:27+5:30
नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अॅड. जयश्री राजकुमार शिंदे राष्ट्रवादीच्या राजश्री विजय रावळ यांचा १२ विरुद्ध ४ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदी निवडून आल्या.
भोर : नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अॅड. जयश्री राजकुमार शिंदे राष्ट्रवादीच्या राजश्री विजय रावळ यांचा १२ विरुद्ध ४ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदी निवडून आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी काम पहिले. या वेळी मुख्याधिकारी संजय केदार व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
भोर शहरात अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी दीपाली शेटे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. शेटे या नगराध्यक्षाही होत्या. परिणामी त्यांचे नगराध्यक्षदही रद्द झाले होते. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यात जयश्री शिंदे यांना १२, तर राजश्री रावळ यांना ४ मते मिळाली. ८ मतांनी जयश्री शिंदे नगराध्यक्षपदावर निवडून आल्या आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष निवडीनंतर आमदार संग्राम थोपटे यांनी जयश्री शिंदे यांचा सत्कार केला. या वेळी प्रदीप खोपडे, शैलेश सोनवणे, सतीश चव्हाण, उमेश देशमुख, चंद्रकांत सागळे, सुवर्णा मळेकर, गीतांजली शेटे, रामनाना सोनवणे, दिलीप बाठे, डॉ. विजयाल पाठक, किसन वीर, तानाजी तारू, नंदा जाधव, वंदना दिघे, पल्लवी सोनवणे, राजकुमार शिंदे, निसार नालबंद, तुकाराम रोमण व नगरिक उपस्थित होते.
या वेळी थोपटे म्हणाले, ‘‘चुकीच्या पद्धतीने शासकीय नियम धाब्यावर बसवून नगराध्यक्षपदाचा गैरवापर करून शहराला वेठीस धरणाऱ्यांचा पुरता धुराळा उडाला आहे. शिंदे यांच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल.’’
हा संघर्ष कोणत्याही पदासाठी नव्हता, तर लोकांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होता. त्याला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आणि सत्याचा विजय झाला आहे. असल्याचे नगराध्यक्षा जयश्री शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)