पिकांवर वनविभागाचा जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 03:04 AM2019-03-01T03:04:13+5:302019-03-01T03:04:27+5:30
अतिक्रमणावर हातोडा : पूर्वसूचना न देताच इंदापूरमध्ये कारवाई
निमसाखर : (ता. इंदापूर) येथे सामाजिक वनविभागाने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्याची कारवाई करत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातूनच जेसीबी मशिन फिरवली. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी आपली पिके कशीबशी वाचवत असताना या कारवाईमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
निमसाखर येथे सामाजिक वनीकरणाचे नीरा नदीलगत मोठे क्षेत्र आहे. त्यापैकी काही क्षेत्र हे वीर धरणग्रस्तांना देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नदीच्या बाजुने सर्व्हे करून हद्द नियोजित करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी पुन्हा सर्व्हे नंबरच्या बांदाने सर्व्हे करून अचानक पण कोणतीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना न देता सुमारे २५ जेसीबी मशिन मोठा फौजफाटा व पिंजरा घेऊन येऊन वनविभागाने ही कारवाई केली.
सुरुवातीला नदीच्या बाजुने केलेला सर्व्हे का बदलण्यात आला व नव्याने केलेल्या सर्व्हे नंबरच्या बांधाच्या सर्व्हेनुसार कारवाई का करण्यात आली? याबाबत शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून यामागे कोणाचा हात तर नाही ना? अशी शंकाही शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.
गेली कित्येक पिढ्या या जमिनी आम्ही कसत असून सात-बाराच्या उताºयाप्रमाणे आम्हाला आमच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात ही जमीन म्हणजे नुसती जमीन नाही तर आमची आणि आमच्या लेकरा बाळाची आई हाय अशी आर्त हाक या ठिकाणचा शेतकरी देत आहे. त्यामुळे वास्तविक पाहता नदीच्या बाजूने हा सर्व्हे करून वनविभागाने त्यांची जमीन हस्तांतरित करावी व शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी येथील शेतकºयांमधून करण्यात येत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून वनविभागाच्या जागेतून अवैधरीत्या रस्ते काढून वाळूउपसा केला जात होता; तसेच मुरुमाची चोरी होत होती. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला, त्या वेळी हे खाते गप्प का होते, असाही प्रश्न परिसरातून विचारला जात आहे.